महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ रंकाळावेस येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (२७ मे २०२३) होणार आहे.” अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाळ पाटणकर व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग यांनी पत्रकार बैठकीत दिली.नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास एक हजारावर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
‘ नागोजीराव पाटणकर हायस्कूलला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर यांनी बहुजन हिताय व बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून १९५५ मध्ये बी. एन. पाटणकर ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेला आता ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या नागोजीराव पाटणकर हायस्कूल, मराठी शाखा व अभिनव बालक मंदिर या शाखा सुरू आहेत. एक हजारावर विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या संस्थेचे डॉ. आर व्ही भोसले, उद्योगपती व्ही बी पाटील, माजी महापौर पी टी पाटील, दिनकरराव यादव असे अनेक माजी विद्यार्थी आहेत.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीविषयी पाटणकर म्हणाले,“ शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. शिष्यवृत्ती , गणित प्राविण्य, क्रीडा स्पर्धा यासह शैक्षणिक क्षेत्रात शाळेची प्रगती दिसत आहे. अटल टिकरींग लॅबच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर रोबोटिक स्पर्धेत या शाळेचा तिसरा क्रमांक आला आहे.”
पत्रकार परिषदेला मुख्याध्यापक एन एल ठाकूर, धनाजी जाधव, चंदू ओसवाल, सूर्यकांत सोनुले, रवि बावडेकर, मंगेश गुरव आदी उपस्थित होते.