प्रो. विजय फुलारी आणि डॉ. ज्योती जाधव हे पाच उमेदवारांच्या शॉर्टलिस्टमध्ये, २६ मे रोजी मुलाखती
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अर्ज छाननीनंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी दोन्ही विद्यापीठासाठी प्रत्येकी पाच उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांमध्ये शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्रो.विजय फुलारी यांचे नाव आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीच्या पाच उमेदवारांच्या शॉर्टलिस्टमध्ये शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रो. ज्योती जाधव यांच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्त आहे. दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या येत्या २६ मे रोजी मुलाखती होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. देशातील प्रमुख विद्यापीठात गणना होणाऱ्या मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या शर्यतीत कोल्हापूर आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा कार्यकाल १० सप्टेंबर २०२२ रोजी संपुष्टात आला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पंधरा मार्च २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कुलगुरुपदासाठी एकूण ८० जणांनी अर्ज केला होता. कुलगुरु शोध व निवड समितीने अर्जांची छाननी करुन २१ जणांच्या दोन दिवसापूर्वी मुलाखती झाल्या. यामधून कुलगुरुपदासाठी निवड समितीने कुलपती कार्यालयाकडे पाच उमेदवारांची शिफारस केल्याचे वृत्त आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यशास्त्र विभागाचे प्रो. लाड, दिल्ली येथील प्रो. श्रीमती शर्मा यांचा समावेश आहे. तसेच अंतिम पाच जणांच्या शॉर्टलिस्टमध्ये शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांचा समावेश आहे. त्या गेली तीन दशके अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात आहेत. उत्कृ्ष्ट महिला संशोधक म्हणून गौरविले आाहे. जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांना स्थान आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची नावे निश्चित केली होती. या २७ उमेदवारांत पुणे विद्यापीठाचे ११ तर शिवाजी विद्यापीठातील तिघा प्रोफसरांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठातील प्रो. श्रीकृष्ण महाजन, प्रो. एस. एस. चव्हाण आणि प्रो. विजय फुलारी यांच्या मुलाखती झाल्या होत्या. कुलगुरू शोध व निवड समितीने अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रो. अविनाश कुंभार, पर्यावरणशास्त्र विभागाचे डॉ. सुरेश गोसावी, भौतिकशास्त्र विभागातील प्रो.संजय ढोले यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या चार जणाव्यतिरिक्त शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रो. विजय फुलारी यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये असल्याच वृत्त आहे. फुलारी यांचे नाव यापूर्वीही विविध विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांत समाविष्ठ होते. संशोधक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अधिकार मंडळावर काम केले आहे.
मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण विराजमान होणार याकडे उच्च शिक्षणक्षेत्राच्या नजरा लागून आहेत. २६ मे रोजी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचे वृत्त आहे. या महिनाअखेरीस मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार हे निश्चित आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठ कॉलेज टीचर असोसिएशनने कुलपती कार्यालयाकडे डॉ. रविंद्र कुलकर्णी व पराग काळकर यांच्या उमेदवारीविषयी आक्षेप नोंदविले आहेत असे असोसिएशनचे महासचिव डॉ. सुभाष आठवले यांनी सांगितले.