महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो यासाठी कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा जागर करण्यात आला. छत्रपतींचा वारंवार अपमान करणाऱ्यांना शिक्षा मिळावी असे साकडे देवीला घालण्यात आले.
"आई गोंधळाला यावे, गोंधळ मांडियेला" म्हणत छत्रपती शिवाजी चौक येथे दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या जागराला सुरुवात झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, स्मिता सावंत, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, शशिकांत बिडकर, सुशील भादिंगरे, आप्पा पुणेकर, मंनजित माने, आदींच्या उपस्थितीमध्ये भवानीमातेला साकडे घालण्यात आले.
" शिवछत्रपतींचा सन्मान न राखणाऱ्यांना शिवप्रेमी जनताच आता धडा शिकवेल. सत्ताधारी मंडळी सत्तेच्या मस्तीत असल्याने त्यांना जनतेचा आक्रोश कळत नाही. छत्रपतींचा वारंवार अपमान करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी भवानी मातेचा जागर करण्यात आला" असे जिल्हाप्रमुख विजय देवणे व शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले.