बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय द्या- आमदार हसन मुश्रीफांच्या नूतन संंचालकांना सूचना
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. या निवडीसंबंधी जिल्ह्यातील नेते मंडळीची बाजार समितीच्या नूतन संचालकासोबत कोहापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बेठक झाली. बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना असे विविध पक्ष एकत्र आले आहेत.
जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार डाॅ. विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, केडीसीसी बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.
या बैठकीत सभापती व उपसभापती निवडीसंबंधी चर्चा झाली. गुरुवारी ( २५ मे) बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची सकाळी ११ वाजता निवड होणार आहे. त्याआधी सकाळी नऊ वाजताच सर्व नूतन संचालकांना कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर येण्याच्या सूचना दिल्या. येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार संजय घाटगे हे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची नावे जाहीर करतील. त्यानंतर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातील विशेष बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब होईल.
दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या बैठकीत बाजार समितीच्या नूतन संचालकांना राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी कामकाजाच्या अनुषंगाने सूचना केल्या. ‘बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. या समितीमध्ये चांगले काम करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. कोल्हापूर बाजार समितीला कांदा -बटाट्याच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात कर गोळा होत आहे. या करसंकलनातील गळती रोखून गैरप्रकारांना पायबंद घालावा लागेल. कर संकलनामध्ये अजूनही दीड ते दोन कोटी रुपये वाढ होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला काढणी पश्चात चांगला जर येण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. बाजार समितीच्या मालकीचे कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठीही संचालक मंडळाने प्रयत्नशील राहावे. कागल - कोल्हापूर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गालगतच बाजार समितीच्या मालकीची जमीन आहे. या जागेवर पेट्रोल व डिझेल पंप उभारण्यासाठीही प्रयत्न करावेत. जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.”
*