+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule26 May 23 person by visibility 328 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “सध्याच्या सरकारचा फिजीकल इन्फ्रास्ट्रक्चवर फोकस आहे. पायाभूत सुविधांची उपलब्धता केलीच पाहिजे पण सोबतीला शिक्षण, आरोग्य, संशोधन व सामाजिक सुरक्षिततेचे काय ?’ असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
शिक्षणतज्ज्ञ आणि पाच विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांच्या ‘विद्येच्या प्रांगणात’या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी (ता.२६ मे) कोल्हापुरात झाला. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आत्मकथनाचे प्रकाशन झाले. माजी मुख्यमंत्री चव्हाण हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.
“डॉ. माणिकराव साळुंखे यांचे आत्मकथन हे जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरक कहाणी आहे. सामान्य कुटुंबांतील एक तरुण संघर्ष करत शिकतो. प्राध्यापक, संशोधक बनतो. पाच विद्यापीठाचे कुलगुरुपद आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील वैज्ञानिक संस्थांतील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालकपद भूषवितात. जिद्द असली की संधीचे सोने करता येते याचा आदर्श वास्तुपाठ म्हणजे साळुंखे यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे आत्मचरित्र शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरू शकणार आहे’असे गौरवोदगार माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काढले.
या समारंभात बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उच्च शिक्षणाची गुणवत्ता, सरकारचे संशोधनाकडे होत असलेले दुर्लक्ष, जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतीय विद्यापीठांचा अभाव अशा विविध गोष्टीवर अतिशय गांभीर्याने टिप्पणी केली. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा निर्णय हा विद्यार्थ्यांचे नुकसान करणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ते म्हणाले, ‘मराठी भाषेविषयी साऱ्यांनाच प्रेम आहे. पण इंजिनीअरिंग आणि मेडिकलचा अभ्यासक्रम मराठीत शिकलेला विद्यार्थी अन्यत्र कसा टिकू शकणार ?’अशी विचारणा करत राज्यकर्त्यांच्या धोरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बौद्धिक क्षमता विकसित करणाऱ्या शिक्षण प्रणालीची आवश्यकता आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
चीन, अमेरिकेतील विद्यापीठ पातळीवरील संशोधनाला प्राधान्य, संशोधकांना सुविधा याचा ऊहापोह करत चव्हाण यांनी देशातील या स्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातील एकही विद्यापीठ जागतिक विद्यापीठाच्या यादीत नाही. आयआयटीसारख्या संस्थेत प्राध्यापकांच्या ४१ टक्के जागा रिक्त आहेत. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससारखी वैज्ञानिक संस्थांची अवस्था बिकट बनली आहे. सरकारचा मात्र फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस आहे. पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. पण देशाची प्रगती केवळ त्या आधारे ठरू शकत नाही. शिक्षण, आरोग्य, संशोधन व सामाजिक सुरक्षितता महत्वाची आहे. नव तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता, स्पर्धात्मक युगात देशातंर्गत नोकऱ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर टिकणारी गुणवत्ता निर्माण केली पाहिजे. याकामी विद्यापीठ संस्थांची भूमिका महत्वपूर्ण आहे. विज्ञानाने तंत्रज्ञानातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. यामध्ये ज्या त्या ठिकाणच्या प्रशासकाची भूमिका मोलाची ठरणार आहे.  ” असे चव्हाण यांनी नमूद केले.
कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी माणिकराव साळुंखे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. तत्व व मूल्ये जपणारे, निर्णयात पारदर्शकता हे साळुंखे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाची उत्तम घडी बसवली होती, माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठाला प्रगतीपथावर आणले. त्यांचे आत्मकथन ह प्रेरणादायी आहे. असे उद्गगार शिर्के यांनी काढले.
 आमदार सतेज पाटील म्हणाले, “कर्तृत्ववान माणसे इतिहास निर्माण करतात. माणिकराव साळुंखे यांची जीवनकहाणी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी विद्यापीठाला दिशा देताना उत्कृष्ट कामकाज करत नावलौकिक वाढविला. ” डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अलोक जत्राटकर यांनी आभार मानले.
……………….
तर माणिकराव साळुंखे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री
उपस्थित सर्वांनीच साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘साळुंखे यांचे कार्य दिशादर्शक आहे. राज्याच्या सध्याच्या राजकारणात काही बदल झाला आणि नवी समीकरणे आकाराला आली तर महाराष्ट्राचे पुढील शिक्षणमंत्री माणिकराव साळुंखे असतील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा योग्य मान राखावा’असे शाहू महाराज म्हणाले.