महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्यफुलवण्याचे काम ‘गोकुळ सारख्या सहकारातील संस्थेने केले आहे त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झाला आहे." असे कौतुकोद्गार शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी काढले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संस्थापक व शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा ९ वा स्मृतीदिनानिमित्त सोमवारी (१६ जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिवम् प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांचे ‘कार्यप्रेरणा’ या विषयवार गोकुळ प्रकल्प येथे व्याख्यान झाले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक करताना गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला.
इंद्रजीत देशमुख म्हणाले, " भाव,विचार,वाणी आणि कृती या चार गोष्टी कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात आत्मसात करणे फार गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या कलागुणाचा वापर संस्थेच्या विकासासाठी करावा त्यामुळे त्या संस्थेबरोबर आपली प्रगती होत असते. साधना शिबिराच्या निमित्ताने मला ही स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचा काही काळ सहवास लाभला होता. ते अत्यंत विनम्र आणि प्रेमळ मनाचे होते."
यावेळी संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,चुयेकर टुंबीय, दूध संस्था प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.