अमेरिकेतील विश्वविख्यात सर्जन डॉ. राज लाला व टीमचे सहकार्य
भारतीय जैन संघटना, डॉ शीतल पाटील फौंडेशनचा उपक्रम
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या विशेष शिबिरात तब्बल 125 हून अधिक रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला, त्यांचे सहकारी व डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यानी संयुक्तरीत्या या शस्त्रक्रिया केल्या.
पद्मश्री डॉ. शरद दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय कदमवाडी येथे २४ आणि २५ सप्टेंबरला मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीटयूट, भारतीय जैन संघटना, जैन डॉक्टर्स फेडरेशन, डॉ. शीतल पाटील फौंडेशन, कृष्णा डायग्नोस्टिक, बी.एम.टेक स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजातील रुग्णासाठी हे शिबीर घेण्यात आले. डॉ. दीक्षित यांचे शिष्य अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व सहकारी व रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी यांनी दोन दिवसात200 हुन अधिक रुग्णाची तपासणी केली. यातील 125 रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या. डॉ अमित बसन्नावार यांनी त्यांना सहकार्य केले.
शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूपता, व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती अशा सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली.
शिबिराच्या उद्घाटनला भारतीय जैन संघटना पदाधिकारी डॉ शीतल पाटील, संघटनेचे पारस ओसवाल, गिरीश कर्नावट, अभिनंदन खोत, राजकुमार शाह उपस्थित होते. हॉस्पिटलचा भुलशास्त्र विभागाचे डॉ कदम, डॉ शीतल देसाई व सहकारी तसेच शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
डी .वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ आर. के. शर्मा यांनी डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन केले.