महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पन्हाळा तालुक्यातील मरळी फाट्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चौघा संशितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून शंभर आणि पाचशे रुपयांच्या साडेचार लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि बनावट नोटा बनवण्याचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी विजय गुरखे यांना कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कळे येथे पांढऱ्या रंगाच्या कारमधून बनावट नोटा घेऊन येणारी टोळी येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा लावला. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील मरळी फाटा येथे पांढऱ्या रंगाची कार पोलिसांनी थांबवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता 100 आणि 500 रुपयांच्या चार लाख 25 हजार 900 रुपयांच्या बनावट नोटा, बनावट नोटा तयार करणारा संगणक, प्रिंटर पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी संशयित चंद्रशेखर बाळासो पाटील (वय 34, रा. कसबा तारळे ता. राधानगरी) अभिजीत राजेंद्र पवार ( वय 40 रा. गडमुडशिंगी, या.करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील ( 28 रा. पुलाची शिरोली ता. हातकणंगले) आणि बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (वय 38 रा. कळे, ता. पन्हाळा) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेषराव मोरे, विनायक सपाटे, हेड कॉन्स्टेबल विजय गुरखे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदुराव केसरे, रणजीत पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रफिक आवळकर सायबर शाखेचे अमर वासुदेव, सुरेश राठोड हे या कारवाईत सहभागी होते.