महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर :
घरफाळा घोटाळ्यातील संशयित संजय भोसले यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.ए. मुल्ला यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केले. गेले १६ दिवस भोसले हे बिंदू चौक सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होते. भोसले याच्यावतीने अॅड प्रकाश मोरे आणि अॅड शैलजा चव्हाण यांनी काम पाहिले.
महानगरपालिका घरफाळा घोटाळ्यातील फिर्यादी तत्कालिन घरफाळा अधीक्षक संजय भोसले यांनी बेकायदशीररित्या घरफाळ्यात सूट दिल्याबद्दल महानगरपालिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी भोसले यांना अटक करुन कोर्टापुढे हजर केले असता १३ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर भोसले यांची रवानगी बिंदू चौक सब जेलमध्ये करण्यात आली. भोसले यांनी जिल्हा न्यायालयात जामिनावर अर्ज केला होता. दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी संजय भोसले यांना पोलिस कोठडी मिळावी म्हणन कोर्टात रिट पिटिशन दाखल केली होती. पण कोर्टाने रिट पिटीशन फेटाळून लावली. त्यानंतर आज सोमवारी भोसले यांच्या जामिनावर जिल्हा व सत्र न्यायाधीश मुल्ला यांच्यासमोर सुनावणी झाली. मुल्ला यांनी एक लाखाचा जामिनावर भोसलेंची मुक्तता करण्याचा आदेश दिला. मंगळवारी ऑर्डर मिळाल्यानंतर भोसले यांना जेलमधून बाहेर सोडण्यात आले आहे. तसेच आठवड्यातून दोन दिवस हजेरी देण्याची अटही घालण्यात आली आहे.