महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. दिव्यांगांची रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिकारी भारावले.
सकाळी शहरातून रॅली काढण्यात आली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. रॅलीमध्ये दिव्यांग शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दरम्यान संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अरुण जाधव, समाजकल्याण अधिकारी घाटे व जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रांगोळी व चित्रकला स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त झालेल्या सतरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
या वर्षाचा जागतिक दिव्यांग दिन जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त गुण मिळालेल्या साई मूकबधिर शाळा, गिजवणे या शाळेला यावर्षीचा जनरल चॅम्पियनशिप विजेता म्हणून गौरविले. याप्रसंगी बोलताना सीईओ चव्हाण यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हा परिषद त्यांच्या पाठीशी असल्याबद्दल ग्वाही दिली.
दिव्यांग दिनाचे सर्व कार्यक्रम घेण्यामध्ये दिव्यांग शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व कास्ट्राईब दिव्याग विभाग शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास कुरूकले व राज्य सचिव विशाल असोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. साधना कांबळे यांनी आभार मानले.